मनावर ताण असलेला माणूस
निरंतर चिंतातूर असतो
शंका साठवत असतो
पुरावे गोळा करत असतो
पाहिलेल्या प्रत्येक दृश्याला
झटकून-दुमडून-मुडपून पाहत असतो
तऱ्हेतऱ्हेच्या micro घड्या घालून
अदृश्याला आकार देत असतो
घड्या उलट-सुलट दुमडताना
नेणिवेच multidimensional
कोडं सोडवत बसतो
(तेव्हढिच काय ती कलात्मक चौकशी)
हा माणूस तरंगत्या आणि विस्कळीत
बिंदुमय अवकाशात वावरत असतो
भितींवर सतत विविधाकाराची
भोकं करत असतो.
(त्याला स्वतःच 'प्रयोग' म्हणतो)
मनावर अनाकलनीय ताण असलेला माणूस
संवादांचे shortcuts design करतो
माध्यमांना कुरवाळतो - गच्च धरतो.
आणि निरंतर संवादी राहण्याला
भौतिक-परमार्थिक-लैंगिक अभिव्यक्ती मानतो.
हा
अखंड संवादांतून
अखंड शंकांची बीजधारणा करून घेतो
म्हणतो ओळख मिटवायचीय.
(स्वामित्वाची शेंडी घट्ट बांधून)
सततच्या ताणा-ताणीतून आलेल्या
दुभंगलेपणावर तो
बुद्धीजीवितेच आरोपण करत असतो.
विचारांचे रम्य ओझ बाळगणारा माणूस
सूत्र शोधत असतो गणिती-
कर्मविपाकाच्या सापशिडीत रंगलेला असतो.
हा माणूस
शंकांची projections करत असतो भवतालावर
लाभणाऱ्या landscapeवर चिंतेची रोपं लावत असतो.
ताणांचे वितरण कसं
सगळीकडे समसमान राहावे
चिंतेचे विश्लेषण
कसे खाजगी राहावे
ह्याकडे लक्ष ठेवून असतो.
चिंता-शंकांच्या झोक्यांतून
वेगाचा भास तयार करत असतो हा माणूस
ह्या माणसाला
डायनोसोर ची रूपके सुचतात
तणावाखाली/साठी
डायनोसोरची मृत अंडी
भटक भटक शोधत असतो.
डायनोसोर ते drongo प्रवास
त्याला रोमांचक वाटतो.
पण करायचा नसतो.
No comments:
Post a Comment